अहमदनगर ब्रेकिंग! शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न, कट्ट्यातील गोळी कट्ट्यातच अडकल्याने
Breaking News | Ahmednagar Crime: नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना. गावठी कट्ट्यातील गोळी कट्ट्यातच फसल्याने पठारे बचावले.
पारनेर : पारनेर शहरात आज, गुरुवारी सकाळी नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार (Firing) करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गावठी कट्ट्यातील गोळी कट्ट्यातच फसल्याने पठारे बचावले. पठारे यांच्या समवेत असलेल्या एकाने गोळीबार करणाऱ्याच्या हातातील कट्टा हिसकावून घेतला. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
युवराज पठारे हे शिवसेनेचे नगरसेवक व पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आहेत. ते विखे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. घटनेनंतर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांनी दूरध्वनीवरून पठारे यांची चौकशी केली. गोळीबाराचा प्रयत्न करणारा अल्पवयीन असून तो पारनेर तालुक्यातीलच रहिवासी आहे. नगरसेवक पठारे यांच्या हत्येचा प्रयत्न का करण्यात आला, याची चौकशी पोलीस करत आहेत. संबंधीत अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पारनेर पोलीस ठाण्यासमोर पठारे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
पारनेर शहरातील बसस्थानकालगत असलेल्या मुख्य चौकातील हॉटेल दिग्विजयमध्ये नगरसेवक पठारे त्यांच्या मित्रांसह चहा घेत होते. तेथे अल्पवयीन युवक गावठी कट्टा व चाकू घेऊन आला. त्याने युवराज पठारे यांच्या छातीवर गावठी कट्टा रोखला व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी कट्ट्यातच अडकल्याने केवळ आवाज झाला. तेथे उपस्थित असलेले पठारे यांचे सहकारी भरत गट यांनी त्या युवकाच्या हातून कट्टा हिसकावून घेतला. त्याच्या समवेत असलेले दोन तरुण पळून गेल्याचे सांगितले जाते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या मुलाने आपण एकटेच आहोत, असे पोलिसांना सांगितले असले तरी पोलीस त्याबाबत खातरजमा करत आहेत. गोळीबाराच्या प्रयत्नाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे जुने भांडण कारण असल्याचे चर्चा होत आहे. दरम्यान राज्यात गोळीबाराची मालिकेचे सत्र सुरूच आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: attempt to shoot at a Shiv Sena corporator, as the bullet from the belt got stuck in the belt itself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study