पत्नी नांदण्यास येत नसल्याने तरुणाने घेतले विष
Breaking News | Ahmednagar: आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणाने पत्नी नांदण्यास येत नसल्याच्या कारणातून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
श्रीगोंदा: एक महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणाने पत्नी नांदण्यास येत नसल्याच्या कारणातून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या दालनातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकास थोरात (रा. चोराचीवाडी, ता. श्रीगोंदा) असे त्या युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, चोराचीवाडी येथील विकास जयसिंग थोरात या तरुणाने तालुक्यातीलच एका गावातील तरुणीशी २८ डिसेंबर २०२३ रोजी देवाची आळंदी येथील एका मंगल कार्यालयात आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. लग्न करून आल्यानंतर ही तरुणी काही दिवस माहेरी गेली होती. या दरम्यान त्या तरुणीने लग्न केल्याची कुणकुण घरातील मंडळींना लागली होती.
पत्नी नांदण्यास येत नसल्याने विकास थोरात याने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिस निरीक्षक भोसले यांच्या दालनात चर्चा सुरू असतानाच त्या तरुणीने विकास थोरात याच्यासोबत जाण्यास नकार दिला. मुलीने नकार देताच विकास थोरात या तरुणाने पॅन्टच्या खिशातून विषारी औषधाची बाटली बाहेर काढत ती प्राशन केली. औषध प्राशन करताच तो तरुण खाली पडला, त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी त्या तरुणास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस कर्मचारी संभाजी गर्ने यांच्या फिर्यादीवरून विकास थोरात तरुणाविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक यांच्या दालनातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: Young man took poison as his wife did not come to sleep
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study