जबरदस्तीनं शेतात ओढत नेलं अन् बलात्कार करून नराधमानं तरुणीचा केला खून
Kolhapur Crime: एका गरीब कुटुंबातील तरुणीचा बलात्कार (Raped) करून खून केल्याची घटना उघडकीस.
कोल्हापूर: रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबातील एका तरुणीचा बलात्कार करून खून केल्याचा प्रकार काल सोमवारी दुपारी वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे उघडकीस आला. या प्रकरणी पेठवडगाव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठवडगाव पोलिस पोलिसांनी काही तासांतच संशयित सनी अरुण कांबळे (रा. वाठार तर्फे वडगाव) याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित कुटुंब लातूर जिल्ह्यातील आहे. ते रोजंदारीसाठी या परिसरात आले होते. संबंधित युवतीला सनी वारंवार त्रास देत होता. त्यावरून त्याला समजही देण्यात आली होती.
सदर तरुणी रविवारी (ता. ८) सायंकाळी कामावरून घरी परत येत होती. त्यावेळी सनीने तिला जबरदस्तीने ओढत एका शेतात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह झुडपात टाकून दिला. घटना घडलेले ठिकाण निर्जन आहे. त्यामुळे खुनाचा प्रकार कुणाला कळला नाही.
संबंधित युवती घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी तिचा सलग पाच-सहा दिवस शोध घेतला. दरम्यान, घटनास्थळावरून दुर्गंधी येऊ लागली होती. ते आज एका शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने पुढे जाऊन पाहिले असता युवतीचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला. त्याने तातडीने ही माहिती पेठवडगाव पोलिसांना दिली.
पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, हवालदार रवी गायकवाड, महेश गायकवाड, मिलिंद टेळी, अजित पाटील, जितेंद्र पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले होते. पोलिस तातडीने तपास करीत संबंधित युवतीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. कपडे तसेच मृतदेहाजवळ पडलेल्या साहित्यावरून वडिलांनी मृतदेह ओळखला. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत सनी कांबळेला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रोहिणी साळुंके, वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरव तळेकर यांनी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह सीपीआरमध्ये पाठविला. तेथे शवविच्छेदन झाले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, निरीक्षक भैरव तळेकर तपास करत आहेत. सनी अरुण कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर वडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Forcefully dragged to the field and raped and murdered the young woman
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App