अकोले संगमनेर शटल बस बंद: आंदोलनाचा इशारा
अकोले: अकोले आगारातून संगमनेरला जाणाऱ्या सर्व शटल बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सर्व शटल बस पूर्वीप्रमाणे सुरु करा. अन्यथा अकोले बसस्थानकावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दिलीप शहा यांनी दिला.
विनावाहक बसचा लाभ संगमनेरला जाणाऱ्या प्रवाशांना होत होत होता. मात्र दिवाळीनंतर शटल बस बंद केल्याने गैरसोय झाली आहे. मागच्या वर्षी अकोल्यातील बसची संख्या ५५ होती. त्यातील बऱ्याच बस नादुरुस्त असल्याने विभागीय नियंत्रणाकडून नवीन बस दिल्या गेल्या नाहीत. सध्या अकोले आगारातून फक्त ३२ बस सुरु आहेत. लांब पल्याच्या अनेक बस बंद केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. विभागीय नियंत्रकांनी अकोलेकरांचे हाल बघून आगारासाठी नवीन बस द्याव्यात अशी मागणी दिलीप शहा यांनी केली आहे. १५ दिवसांत बससेवा पूर्ववत न झाल्यास प्रवासी संघटना बस स्थानकावर रस्ता रोको करेल असा इशारा देताना याची संपूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहील असाही इशारा देण्यात आला आहे.
Website Title: Latest News Akole Sangamner shuttle bus shut down