टीम इंडियाची विजयी दिवाळी, थरारक सामन्यात पाकिस्तान पराभूत
India Vs Pakisatan Live Match: भारतीय संघाने मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली. विराट कोहली खरा नायक ठरला, ४ विकेटसने विजय मिळविला.
मेलबर्न: विराट कोहलीची ‘विराट’ इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात 4 विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला. पाकिस्ताननं या सामन्यात भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली. या विजयासह भारतीय संघाने गेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला आहे.
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले. त्यानंतर अर्शदीपने भरात असलेल्या महंमद रिझवानचाही अडसर दूर केला. 2 बाद 15 अशा बिकट स्थितीतून शान मसुद व इफ्तेकार अहमद यांनी डाव सावरला व तिसऱ्या गड्यासाठी 76 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. मात्र, त्याचवेळी महंमद शमीने इफ्तेकारला बाद केले व ही जोडी फोडली.
इफ्तेकारने आपल्या 51 धावांच्या खेळीत 34 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकार फटकावले. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करताना हार्दिक पंड्यानेही पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत त्यांच्या धावसंख्येला लगाम लावला. पाकिस्तानच्या शादाब खान, हैदर अली, महंमद नवाज व असीफ अली यांनी साफ निराशा केली. डावातील अखेरच्या षटकांत मसुदने तळातील फलंदाज शाहिन शाह आफ्रीदी व हॅरीस रौफ यांना साथिला घेत संघाला दीडशतकी धावांपर्यंत मजल मारुन दिली.
आफ्रीदीने 16 तर हॅरीसने नाबाद 6 धावा केल्या. मसुदने आपल्या नाबाद 52 धावांच्या संयमी खेळीत 42 चेंडूत 5 चौकार फटकावले. भारताकडून हार्दिक पंड्या व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार व महंमद शमी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 8 बाद 159 असा रोखला गेला.
Web Title: India Vs Pakisatan Live Match t20 2022