Home अकोले अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान, पिचड विरोधात मविआ लढत

अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान, पिचड विरोधात मविआ लढत

Agasti Sugar factory Election: २१ संचालक निवडीसाठी आज रविवारी मतदान.

Agasti Sugar factory Election Today

अकोले: अकोलेतील अगस्ती सहकारी साखर कारखाना २१ संचालक निवडीसाठी आज रविवारी मतदान होत आहे. ९ मतदान केंद्रांवर २३ बुथवर २२५ कर्मचारी मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. माजी मंत्री मधुकर पिचड विरोधात महाविकास आघाडी एकत्र आल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकप नेते डॉ. अजित नवले, कम्युनिस्ट नेते कॉ. कारभारी उगले, आर पी आय चे नेते विजयराव वाकचौरे आदींच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात सरळ चुरशीची लढत होत आहे.

9 मतदान केंद्रात 23 बुथसाठी सहकार विभागाचे 225 कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना झाले असून 8342 सभासद मतदार व 50 उत्पादक व बिगर उत्पादक पणन संस्था प्रतिनिधी असे एकुण 8392 मतदार आज रविवारी मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक बुथवर एक बुथ प्रमुखासह 8 कर्मचारी असे एकूण 225 कर्मचारी नियुक्त केलेले आहे.

रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 5 मतदान होईल तर 26 सप्टेंबर रोजी के. बी. दादा सभागृह, अकोले महाविद्यालय येथे सकाळी 9 वा मतमोजणीला सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जी. जी. पुरी यांनी दिली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची 2022 ते 2027 ची सार्वत्रिक निवडणूक आज रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी होत आहे. मतदानासाठी तालुक्यातील 9 गावात 9 मतदान केंद्र व त्यात 23 मतदान बुथ उभारण्यात आले आहे. सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत मतपत्रीकेवर रबरी शिक्का पद्धतीने मतदान केले जाणार आहे. यावेळी सर्वसाधारण गटाच्या 02, महिला, इतर मागास वर्ग, एन.टी., एस.टी 01 व पणन संस्था 01 अशा 04 मतपेट्या प्रत्येक बुथवर ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वा. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍याच्या व पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे.

उद्या सोमवार दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी अकोले महाविद्यालयाच्या कै. के. बी. दादा सभागृहात सकाळी 9 वा मतमोजणी होणार असुन मतमोजणीसाठी 22 टेबल करण्यात आले आहेत. फेरी निहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकुण 04 फेर्‍यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अगस्ति कारखान्याच्या यापूर्वी झालेल्या मतमोजणीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगून पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1 उपविभागीय पोलिस अधिकारी, 1 पोलिस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 5 पोलिस उपनिरीक्षक, 110 पोलिस कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी असा बाहेरील स्टाफ आला आहे. 10 होमगार्ड, अकोले पोलिस स्टेशन, व राजूर पोलिस स्टेशनचे पोलिस आधिकारी व कर्मचारी असा मोठा पोलिस फौज फाटा अगस्ती कारखाना निवडणूक प्रक्रियेसाठी ठेवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.

तालुक्यातील 9 मतदान केंद्रावरील बुथ पुढीलप्रमाणे अगस्ती महाविद्यालय, अकोले, प्रवरा विद्यालय, प्रवरा विद्यालय, इंदोरी, सत्यनिकेतन सर्वोदय मंदिर, राजुर, आदिवासी उन्नती सेवा मंडळ आश्रमशाळा शेंडी (भंडारदरा डॅम), अगस्ती विद्यालय अकोले, शासकीय आश्रमशाळा, कोहणे, जिल्हा परिषद शाळा, कोतुळ, जिल्हा परिषद शाळा, कोतुळ, जिल्हा परिषद शाळा, धामणगाव पाट, जिल्हा परिषद शाळा, समशेरपूर, जिल्हा परिषद शाळा, देवठाण या मतदान बुथ केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Web Title: Agasti Sugar factory Election Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here