संगमनेरात गुटखा विक्रेत्यावर छापा, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
Sangamner Raid: ३१ हजार ५०० रुपयांचा गुटखा व एक मोटारसायकल असा १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
संगमनेर: राज्यात गुटखा बंदी असतांना देखील संगमनेरात सर्रास गुटखा विक्री करणार्या विक्रेत्यावर पोलिसांनी छापा टाकून त्यास पकडले. त्याच्याकडून ३१ हजार ५०० रुपयांचा गुटखा व एक मोटारसायकल असा १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबरार सलीम शेख (वय २७, रा. भारतनगर, संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. शहरात एक व्यक्ती मोटारसायकलहून गुटखा विक्री करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळाली. त्यांच्या सुचनेवरुन पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, पोलीस नाईक ए. के. दातीर, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, प्रमोद गाडेकर यांनी भारतनगर पसिररातील एका हॉस्पिटलजवळ सापळा लावला.
रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एक इसम मोटारसायकल क्रमांक एम. एच. १७ सी. टी. ७४८६ हून दोन गोण्या घेवून येत असतांना दिसला. त्यास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. सदर मोटारसायकल बाजूला घेतल्यानंतर त्याच्या वाहनावरील गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये पिवळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पाकीट असलेले हिरा पान मसाला असे एकूण २१० पाकिट प्रत्येकी १२० रुपये किमतीचे व पिवळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पाकिट रोयॉल कंपनीची ७१७ चे तंबाखुचे २१० पाकिट प्रत्येकी ३० रुपये किमतीचे असा दोन्ही मिळून ३१ हजार ५०० रुपयांचा सुगंधित तंबाखू व पान मसाला तसेच मोटारसायकल १ लाख रुपये किमतीची असा एकूण १ लाख ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर माल विक्री करणारा अबरार सलीम शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अबरार सलीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७९१/२०२२ भारतीय दंड संहिता १८८, २७२, २७३, ३२८, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियमाचे कलम ५९, २६ (२), (४) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहे. आरोपी अबरार सलीम शेख यास अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title: Gutkha seller raid in Sangamaner, goods worth half a lakh seized