संगमनेर: प्रवरा नदीपात्रात मृतदेह सापडला, ड्रोन कॅमेराच्या साह्याने शोध
Sangamner Breaking: कॅमेऱ्याच्या साह्याने शोध घेत असताना खंदारे यांचा मृतदेह (Dead body) नदीपात्रात सापडला.
संगमनेर: मालवाहतूक करणारे पिकअप हे चारचाकी वाहन पुलावरून नदीपात्रात पडून पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री नऊच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जोर्वे-पिंपरणे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीच्या पुलावर घडली होती. बुधवारी चालक प्रकाश किसन सदावर्ते (रा. जालना) यांचा मृतदेह सापडला. तर बेपत्ता असलेल्या सुभाष आनंदराव खंदारे (रा. जालना) यांचा मृतदेह शुक्रवारी सापडला. ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने शोध घेत असताना खंदारे यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला.
नदीपात्रात पडलेली पिकअप आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास क्रेनच्या साह्याने पिकअप बाहेर काढण्यात आली. चालक प्रकाश किसन सदावर्ते (रा. जालना) यांचा मृतदेह सापडला. तर सुभाष आनंदराव खंदारे (रा. जालना) हे बेपत्ता होते. नदीला पूर आल्याने शोधकार्यात अडथळा येत होता. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या गावांतील मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील आणि कोतवाल यांचे पथक स्थापन करण्यात आले. त्यांना ग्रामस्थांची मदत होत होती. ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने शोध घेत असताना घडलेल्या घटनेपासून काही अंतरावर खंदारे यांचा मृतदेह आढळून आला. तो बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला.
चालक प्रकाश किसन सदावर्ते यांनी पिकअपमधील काचा खाली करण्यासाठी बिटको, नाशिक येथून अमोल अरुण खंदारे आणि सुभाष आनंदराव खंदारे यांना सोबत घेतले होते. हे तिघेही सोमवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे पोहोचले. तेथे काचा खाली केल्यानंतर ते संगमनेरच्या दिशेने यायला निघाले. जोर्वे आणि पिंपरणे गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीच्या पुलावर पिंपरणेकडून येत असताना चालक सदावर्ते यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप नदीपात्रात कोसळली होती. पोहता येत असल्याने यातील अमोल खंदारे हे बचावले होते.
Web Title: Sangamner Dead Body found in Pravara river bed