Accident | संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर कारचा अपघात
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील कुर्हाडे वस्ती येथे कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना बुधवारी दि.18 मे रोजी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अभिजीत शंकर लुगडे (वय 27, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), प्रसाद पद्माकर कलाल (वय 32 रा. नवी मुंबई) व एक महिला नाव समजू शकले नाही असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. तिघे कारमधून (क्र. एमएच. 12, यूसी. 2174) नाशिकला कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून पुन्हा ते संगमनेरमार्गे पुणेच्या दिशेने जात होते. बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील माळवाडी कुर्हाडे वस्ती येथे आले असता त्याचवेळी कारला भीषण अपघात झाला. त्यामुळे कार थेट महामार्गावर आडवी झाली. त्यानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, अरविंद गिरी, उमेश गव्हाणे, नंदकुमार बर्डे, पोलीस पाटील संजय जठार यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
Web Title: Sangamner Car accident on Pune-Nashik highway