वीजपंप मोटार काढताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
सोनई | Ahmednagar News: घोडेगाव चांदा रस्त्यावर शेतातील विहिरीत मोटार काढत असताना एका तरुण मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या दोनशे ग्रामस्थांनी सोनई पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केल्याने पोलसांनी विहीर मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी एकनाथ सावंत वय २६ असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांची शेती आहे. विहिरीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढण्यासाठी शिवाजी सावंत याला आणले होते.तो हे काम करण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत मालकाने कोणतीही खबरदारी घेतली नव्हती असे फिर्यादीत नमूद केले आहे.
सुरुवातीला सोनई पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र कुटुंबातील सदस्यांनी विहीर मालकावर गुन्हा दाखल केला तरच मृतदेह ताब्यात घेऊ असे सांगितले. नाथपंथी समाजाचे पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करीत आहे.
Web Title: Ahmednagar News Young man dies after falling into well