रेमडेसिवीर काळ्याबाजारात विकताना दोघांना अटक
अहमदनगर: कोरोना रुग्णासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या दोघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी पकडले आहे. या दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
हे दोघे जण एक इंजेक्शन तब्बल ३७ हजार रुपये किमतीला विकताना आढळून आले. या दोघांना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ज्ञानेश्वर कौतुक हरपे रा. एमआयडीसी नगर, महेश नारायण कुऱ्हे रा. सावेडी नगर या दोघांना अटक करण्यात आली असून २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामधील तिसरा आरोपी सुहास जगताप रा. वांबोरी ता. राहुरी हा फरार आहे. याबाबत औषध निरीक्षक विवेक खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.
शहरातील साईदीप रुग्णालयाच्या परिसरात एक जण काळ्याबाजारात इंजेक्शन विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सापळा लावून बनावट गिर्हाईक बनून महेश कुऱ्हे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता कुऱ्हे याने ३७ हजार रुपयांना इंजेक्शन देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर कुऱ्हे याने हरपे याच्याकडून इंजेक्शन मागून घेतले. त्यानंतर पोलिसांनी इंजेक्शन, दुचाकी व मोबाइल जप्त केला. त्या दोघांना पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Web Title: Two arrested while selling Remedesivir