धक्कादायक: गुरुकुल आश्रमातील आणखी 5 मुलींवर अत्याचार, संस्थाचालकावर पाच गुन्हे
Nashik Crime News: आश्रमातील मुलीना विश्वासात घेऊन चौकशी केली असता अत्याचार (abused) केल्याचे आले समोर. संस्थाचालाकाविरोधात आणखी पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
नाशिक: म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाचा नराधम संस्थाचालक हर्षल मोरे याच्याविरोधात पॉक्सोअन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटीअन्वये आणखी पाच गुन्हे दाखल करण्यात आले. मोरे याने आश्रमातील चार अल्पयीन व एका १९ वर्षीय पीडितेवर अत्याचार केल्याची गंभीर बाब पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे.
आश्रमातील मुलींना पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता पीडित मुलींनी आपबिती सांगितली. यामुळे या नराधम संस्थाचालकाविरोधात नव्याने आणखी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील गोरगरीब मुलींना शिक्षणासाठी आणत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
म्हसरूळ परिसरातील रो-हाउसमध्ये ‘द किंग’ फाउंडेशन संचालित ‘ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रम’ या नावाने संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे (वय ३२) याने २०१८ मध्ये आश्रम सुरू केला. जिल्ह्यातील आदिवासी वाड्या-पाड्यांवर जाऊन त्याने मुला-मुलींना शिक्षणासाठी या आश्रमात आणले होते.
आजमितीस १४ मुली व १३ मुले आश्रमात वास्तव्याला असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या १३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान त्याने आश्रमातील एका १४ वर्षीय शालेय अल्पवयीन मुलीस पाय दाबण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीत बोलाविले. त्या वेळी त्याने पीडित मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखविले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत वाच्यता केल्यास आश्रमातून काढून देण्याची धमकीही दिली.
या प्रकाराने भांबावलेल्या पीडितेने नंतर सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर फसाळे यांना अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे आश्रमात नराधम मोरे याच्याकडून सुरू असलेल्या अत्याचाराला वाचा फुटली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात पॉक्सो अन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना करीत आहेत.
दरम्यान, प्रकरण संवेदनशील आणि आश्रमात मुली वास्तव्याला असल्याने नराधमाकडून आणखीही काही मुलींवर अत्याचार करण्यात आला असावा याची शक्यता होती. त्यादृष्टीने पोलिसांनी आश्रमातील मुलींना विश्वासात घेत त्यांच्याकडे चौकशी सुरू केली असता, धक्कादायक माहितीच समोर आली.
नराधम मोरे याने आश्रमातील आणखी पाच मुलींवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. यातील चार मुली १४ ते १६ वयोगटातील अल्पवयीन आहेत, तर एक पीडिता १९ वर्षांची आहे. नराधमाने आश्रम सुरू केल्यापासूनच मुलींचा विनयभंगासह लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह पोलिसांनी दोन दिवसांत सखोल चौकशी केली. त्यानुसार, म्हसरूळ पोलिसांत नराधम मोरे याच्याविरोधात पीडितांच्या फिर्यादीनुसार स्वतंत्ररीत्या पॉक्सोअन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Web Title: 5 more girls abused in Gurukul Ashram
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App