२२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Jalgaon Suicide: सासरच्या मंडळींच्या जांचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
जळगाव- दारू पिऊन मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जांचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धानवड (ता. जळगाव) येथे घडली.
सासरच्या मंडळींकडून मुलीला गळफास देऊन मारण्यात आल्याचा आरोप करीत मृत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या पतीसह संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तत्काळ अटकेची मागणी केली आहे. सोनी चेतन चव्हाण (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
धानवड (ता. जळगाव) येथील सोनी चेतन चव्हाण (वय २२) ही विवाहिता पती आणि दोन मुलांसह राहत होती. सोमवारी (ता.१७) रात्री दहाच्या सुमारास सोनी चव्हाण यांनी घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.
घडला प्रकार उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी तिला खाली उतरवून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन देवचे यांनी तपासणीअंती सोनी चव्हाण यांना मृत घोषित केले.
साधारण ३ वर्षांपासून सोनी यांचा पती चेतन गजानन चव्हाण याला दारुचे व्यसन जडले असून, दारुच्या नशेत तो त्यांना रोजच मारहाण करीत होता. विनाकारण होणारी मारहाण, गांजपाट याला कंटाळून सोनीने यापूर्वी देखील विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मात्र, आता घडलेली घटना ही आत्महत्या नसून गळा आवळून मारुन नंतर तिला लटकविण्यात आले, असा आरोप मृत विवाहितेची आई अनिता विनोद जाधव (रा. नांद्रा तांडा, सोयगाव) यांच्याकडून करण्यात आला आहे.
Web Title: 22-year-old married woman commits suicide by hanging herself