अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरी
Breaking News | Ahmednagar: खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. तेथे तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार.
अहमदनगर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी २० वर्षे सक्तमजुरी व नऊ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश बाबुराव कडूसकर (वय ४१ रा. डोंगरवाडी, ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून वैशाली राहुल राऊत यांनी काम पाहिले.
मार्च २०२२ पासून ते १३ जुलै २०२२ रोजी रात्री साडेसात वाजेपर्यंत वेळोवेळी पारनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या घराजवळ असलेल्या तळ्याकाठी तिला प्रकाश कडूसकर याने खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. तेथे तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. झालेला प्रकार घरच्यांना सांगितला तर आई-वडिलांचा गुपचूप काटा काढील, त्यांना जिवे मारील अशी धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीने पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा संपूर्ण तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात ग्रामसेवक यांची साक्ष नोंदविण्यात आली.
सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील राऊत यांनी युक्तीवाद केला की, पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १५ वर्षे १० महिन्यांची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वय वर्षे १५ वर्षे १० महिने असलेली मुलगी ही आरोपी विरूध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, असा युक्तीवाद केला.
न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३७६ (३) नुसार २० वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, भादंवि कलम ५०६ (२) नुसार एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार आडसुळ, एस. एन. बडे यांनी सहकार्य केले.
Web Title: 20 years hard labor for raping a minor girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study