संगमनेर तालुक्यात पावसामुळे १८ घरांची पडझड, शेतकऱ्यांना रडवलं
Sangamner News: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे (Rain) कांदा, टोमॅटो, मका, डाळिंब आणि झेंडूची फुले व इतर 430 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान.
संगमनेर: संगमनेर तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, टोमॅटो, मका, डाळिंब आणि झेंडूची फुले व इतर 430 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर 18 घरांची अंशतः पडझड झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीपावरच भिस्त अवलंबून होती. मात्र खरीपाची पिके काढणीला आली आणि अवकाळी पावसाने हजेरी लावत नुकसान केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे.
संगमनेर तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वादळवाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. मात्र या पावसाने मोठ्या प्रमाणात निमगाव खुर्द व बुद्रुक, सावरचोळ, पेमगिरी, नांदुरी दुमाला, अंभोरे व कोळवाडा या भागातील उन्हाळ कांदा, टोमॅटो, झेंडू, मका, डाळींब यासह भाजीपाला व चारा पिकांचे सुमारे 430 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही भागातील काढलेल्या गव्हाची पिकंही या पावसात भिजले आहे.
अवकाळी पावसाच्या नुकसानीमुले बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. लागोपाठ बळीराजाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यातून सावरत असतानाच आता निसर्गाने रब्बी पिकांवरही घाव घातल्यामुळे राज्यासह तालुक्यातील बळीराजा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. सध्या तालुक्यातील बहुतेक भागात उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरु असतानाच अवकाळीने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काढून ठेवलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचीही संधी मिळाली नाही.
Web Title: 18 houses collapsed due to rain in Sangamner taluka, farmers cried
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App