बसमधून पडून दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
Breaking News | Bus Accident: एस.टी. बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने गर्दीमुळे या दरवाजाजवळच उभी असलेली 16 वर्षीय विद्यार्थीनी दरवाजातून बसखाली जमीनीवर पडून गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना.
मालेगाव: भरधाव एस.टी. बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने गर्दीमुळे या दरवाजाजवळच उभी असलेली 16 वर्षीय विद्यार्थीनी दरवाजातून बसखाली जमीनीवर पडून गंभीररित्या जखमी झाल्याने गतप्राण झाली. तालुक्यातील कंक्राळे येथे घडलेल्या या घटनेने शोककळा पसरली असून बसच्या दुरावस्थेबद्दल ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील कंक्राळे येथील जयश्री हिरामण कन्नोर (16) ही विद्यार्थीनी करजंगव्हाण येथील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये दहावीत शिकत होती. नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी जयश्रीसह इतर विद्यार्थी मालेगाव आगाराच्या गरबडमार्गे आलेल्या बसमध्ये चढले. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने जयश्री बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळ उभी होती. आपत्कालीन दरवाजा कंक्राळे गावापासून पाचशे मीटर अंंतरावर अचानक उघडला.
यात जयश्री भरधाव असलेल्या बसमधून पाठीमागे रस्त्यावर पडली. हे निदर्शनास येताच बसमधील प्रवाशी व विद्यार्थ्यांनी आरडाओरड करताच बस थांबली.
बसमधून खाली पडलेल्या जयश्रीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला ग्रामस्थांनी तातडीने मालेगावी खासगी रुग्णालयात दाखल केले गेले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती ती मृत असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत जयश्रीच्या नातेवाइकांना एसटीतर्फे मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी केदा किसन कन्नोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी प्रशांत हिरामण चव्हाण (रा. शेंदुर्णी) व नितीन साखरचंद शेवाळे (सायने) या बस चालक-वाहक यांच्याविरूध्द जयश्रीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय एच.डी. चव्हाण हे करीत आहेत.
Web Title: 10th student dies after falling from bus
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study