स्टंटबाजी जीवावर बेतली! नदीच्या पाण्यात तरुण गेला वाहून
Ahmednagar river : अहमदनगर-कल्याण रोडवरील पुलावरील घटना, वाहत्या पाण्यातून पुल ओलांडण्याचा प्रकार एका तरुणाच्या जीवाशी.
अहमदनगर: स्टंटबाजी तरुणाच्या जीवावर बेतली आहे. अहमदनगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलावरून आज सकाळपासून पाणी वाहत आहे. या वाहत्या पाण्यातून पुल ओलांडण्याचा प्रकार एका तरुणाच्या जीवाशी आला आहे. पुल ओलांडायला गेलेला तरुण हा पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. विशाल बंडू देवतरसे, असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव समजत आहे. याबाबत शहरभर चर्चा सुरु आहे.
हा तरुण नालेगाव येथील रहिवाशी आहे. ही घटना आज सायंकाळी घडली. पाण्याचा प्रवाह एवढा आहे की, हा तरुण नेमका कोठे वाहून गेला आहे, याचा शोध घेणे आता अवघड बनले आहे. या तरुणाने केलेल्या स्टंटचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
अहमदनगर शहरासह नगर तालुक्यातील परिसरात पहाटंपासून पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे सीना नदीपात्र सकाळपासून दुथडी भरून वाहत आहे. सायंकाळी नदीपात्रातील प्रवाह वाढला होता. त्यामुळे अहमदनगर कल्याण रोडवरील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. यातच या तरुणाने सायंकाळी स्टंटबाजी केली आणि ती जीवाशी आली आहे. स्टंटबाजीची अहमदनगर शहरभर चर्चा होती.
Web Title: young man was carried away in the water of the river