Home पुणे ‘जीवन आणि मृत्यू तुझ्याचसाठी…’; पतीचा अंतिम क्षण जवळ येताच पत्नीची आत्महत्या

‘जीवन आणि मृत्यू तुझ्याचसाठी…’; पतीचा अंतिम क्षण जवळ येताच पत्नीची आत्महत्या

Suicide Case: पतीचे निधन अटळ असल्याचे कळताच, त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पना सहन न झाल्याने महिलेने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना.

Woman commits suicide by jumping into Indrayani river

आळंदी: पतीच्या गंभीर आजारपणामुळे खचलेल्या एका पत्नीने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना आळंदी  परिसरात घडली आहे. पतीचे निधन अटळ असल्याचे कळताच, त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पना सहन न झाल्याने महिलेने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिने मागे ठेवलेली चिठ्ठी तिच्या भावनांची तीव्रता दर्शवते.

अश्विनी मंगल चक्रवार वय ४६, रा. यशोदानगरी, डुडुळगाव, असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती गंगाधर चक्रवार, वय ६५, हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हे दाम्पत्य मूळचे नांदेडचे असून, उदरनिर्वाहासाठी गेल्या पाच वर्षांपासून ते आपल्या एका मुलासह आणि मुलीसह आळंदी परिसरात वास्तव्यास होते. गंगाधर यांच्यावर लोहेगाव येथील एका खासगी रुग्णालयात कर्करोगाचे उपचार सुरू होते.

उपचार सुरू असताना, डॉक्टरांनी अश्विनी यांना पती गंगाधर यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, वैद्यकीयदृष्ट्या आता बरे होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यांना घरी घेऊन जाऊन त्यांची सेवा करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पतीवर नितांत प्रेम करणाऱ्या अश्विनीसाठी हा खूप मोठा मानसिक धक्का होता. पतीशिवाय पुढील आयुष्य जगण्याची कल्पना त्या करू शकत नव्हत्या. याच तीव्र भावनेतून त्यांनी ‘जीवन आणि मृत्यू दोन्ही तुझ्याचसाठी…’ अशा आशयाची एक चिठ्ठी लिहून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

रविवार, ६ एप्रिल रोजी सकाळी अश्विनी यांनी पती गंगाधर यांना सांगितले की, त्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी जात आहेत. परंतु, त्या मंदिरात न जाता त्यांनी थेट इंद्रायणी नदीच्या दिशेने जाऊन पुराच्या पाण्यात उडी मारून आपले जीवन संपवले. त्यांचे पती गंगाधर हे आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराजवळील किसनमहाराज साखरे मठात पुजारी म्हणून सेवाकार्य करत होते, अशी माहिती मिळाली आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अश्विनी यांचा मृतदेह नदीच्या प्रवाहातून बाहेर काढला आणि पुढील तपासणीसाठी शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी अधिकृत माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके  यांनी दिली. पती-पत्नीमधील अतूट प्रेम आणि नियतीच्या आघातामुळे घडलेल्या या करुण घटनेने डुडुळगाव आणि आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Woman commits suicide by jumping into Indrayani river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here