अवकाळी पावसाचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला; कधीपर्यंत बरसणार?
Maharashatra Rain Alert: मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यात रविवार दि. २३ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता.
मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस अवकाळीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. अगोदरच अवकाळी पावसाने व गारपीट यांनी थैमान घालत शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अवकाळी पाऊस, गारपिटीदरम्यान अनेक भागांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनाही घडत आहे. त्यामुळे या वातावरणात घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात उद्या रविवार १६ एप्रिलपासूनअपेक्षित असलेली अवकाळी वातावरण निवळण्याची शक्यता केवळ कोकणातील चार आणि विदर्भातील ११ अशा एकूण १५ जिल्ह्यांतच केवळ दोन दिवसासाठी (दि.१६, १७) मर्यादित जाणवत आहे. मंगळवार १८ एप्रिलपासून पुन्हा या ठिकाणी अवकाळी वातावरणाची शक्यता तशीच आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, पुणे येथील निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यात रविवार दि. २३ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता आहे. जोपर्यंत दक्षिण अर्धभारतातील वारा खंडितता प्रणाली बदलत/ नामशेष होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातीलही अवकाळी वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता मुळीच नाही, असेच वाटते. आज या खंडिततेचा आस समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत हवेचा निर्वात जाडीचा थर झारखंडपासून ओरिसा, आंध्रप्रदेश राज्यातून तामिळनाडू राज्यापर्यंत पसरलेला आहे, असंही माणिकराव खुळे यांनी माहिती देताना सांगितले.
Web Title: Unseasonal rain extended stay in Maharashtra
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App