अहिल्यानगर: अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला
Breaking News | Ahilyanagar: अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह (Dead body) कर्जत तालुक्यातील रवळ गाव येथे आणून जमिनीत पुरल्याची घटना.
कर्जत : अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह कर्जत तालुक्यातील रवळ गाव येथे आणून जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीचा खून करून तो गुन्हा लपवण्यासाठी रवळ गावाच्या शिवारामध्ये मृतदेह आणून तो जमिनीमध्ये अर्धा उघडा व अर्धा मातीमध्ये पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रवळ गाव कोंभळी रस्त्यावर रवळ गाव हद्दीत गट नंबर २२४ गोरख पंढरीनाथ खेडकर यांच्या मालकीच्या माळरान जमीन क्षेत्रात अनोळखी चेहरा असलेल्या पुरुषाचा मृतदेह सकाळी फिरायला येणाऱ्या तरुणांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील सुनील रामचंद्र खेडकर यांना माहिती दिली असता पोलीस पाटलांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना याबाबत कळवले. तात्काळ पोलीस पथक घेऊन ते घटनास्थळी आले.
त्यांच्यासोबत सतीश भताने , पो.हे.कॉ.सुनिल माळशिखरे, गुप्त वार्ता विभागाचे वैभव सुपेकर, विलास चंदन , सुनिल खैरे यांनी या परिसराची पूर्ण पाहणे केली. यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन तात्काळ श्वान पथक बोलावून घेतले. त्याने काही अंतराचा माग काढला. परंतु काही निष्पन्न झाले नाही. श्वान पथकाला रिकामे परत जावे लागले. तसेच यावेळी घटनास्थळावरून फॉरेन्सिक लॅबने रक्ताचे व गुन्ह्यात वापरलेल्या दगडावरील ठसे यांचे नमुने घेतले असून ते नाशिक येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. यावेळी शासकीय साक्षीदार म्हणून सुभाष हारी खेडकर, अनिल लहू मथे ग्रामसेवक (रवळगाव) उपस्थित होते. घटनास्थळावरून अनोळखी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेनासाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वाखारे , प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भताने करत आहेत.
Web Title: unknown person was killed and the body was buried in the ground
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News