उद्धव ठाकरेंनी शेतकर्यांसाठी एक तरी कारखाना उभारला का? राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला समाचार
Breaking News | Ahilyanagar: वक्तव्याचा विपर्यास करून टीका करणे सोपे आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी शेतकर्यांसाठी एक तरी कारखाना किंवा उद्योग उभारला का? अशा शब्दांत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राहाता: आमचा डीएनए शेतकर्यांचा आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून टीका करणे सोपे आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी शेतकर्यांसाठी एक तरी कारखाना किंवा उद्योग उभारला का? अशा शब्दांत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishana Vikhe Patil) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अस्तगाव येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते. वर्षानुवर्षे ग्रामीण भागात कर्ज घेऊन निवडणुका लढवल्या जातात. घेतलेल्या कर्जाची कोणतीही उत्पादकता होत नाही. यातून तेच पुन्हा कर्जबाजारी होतात. मात्र वक्तव्याचा अर्धा भाग दाखवून मला शेतकरी विरोधी ठरवल्याने मोठा वेदना झाला. माझ्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात कधीही शेतकर्यांच्या विरोधात माझी भूमिका किंवा वक्तव्य नाही. राज्यात कृषी मंत्री असताना सुरू केलेल्या असंख्य योजनांची आठवण आणि लाभ आजही शेतकर्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात अतिवृष्टीने नुकसानी झालेल्या शेतकर्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 32 हजार कोटींचे पॅकेज नुसते जाहीर केले नाही तर त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्यांना 1472 कोटी रुपयांची मदत मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले, माझ्या विधानाचा आणि कारखान्याचा काय संबंध? आमच्या कारखान्याला सुरू होऊन 75 वर्षे झाली. उद्धवजींनी एखादा तरी कारखाना सुरू केला किंवा चालवून दाखवला का? टीका करणे सोपे आहे. शेतकरी हिताचा एखादा उद्योग किंवा किमान बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन दाखवावा, असा टोला लगावून उचलली जीभ लावली टाळ्याला एवढेच त्यांचे काम आहे.
अडीच वर्ष राज्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली, पण एकही शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मराठवाड्यात जाऊन हेक्टरी 50 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती, त्याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला.
संघाच्या माध्यमातून शिवसेना संपविण्याच्या झालेल्या आरोपांवर बोलताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, त्यांना भाजपाचे पाठबळ होते हे जगजाहीर आहे. आता किती दिवस तुम्ही शिळ्या कढीला ऊत आणणार आहात? तुमच्याकडे सांगण्यासाठी काहीच राहिलेले नाही. त्यांच्या घरावर कोण घिरट्या घालत आहे मला माहीत नाही, पण उद्धव ठाकरे स्वतःभोवती घिरट्या घेत असावेत, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
या राज्यातील शेतकर्याची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. यापूर्वी वाढवलेल्या हमीभावाच्या निर्णयाचा मोठा लाभ शेतकर्यांना झाला. प्राकृतिक शेतीला प्राधान्य दिले जात असून महायुती सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही देतानाच जून 2026 मध्ये कर्जमाफी करण्याच्या आश्वासनाची पूर्तता निश्चित होईल याची काळजी बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) करू नये, त्यांनाच कोणी वाली राहिलेले नाही, अशी मिश्कील टिपणी त्यांनी सरकावर केलेल्या आरोपांवर केली.
Breaking News: Uddhav Thackeray built at least one factory for farmers Radhakrishana Vikhe Patil
















































