संगमनेरातून अयोध्येत गोळीबार करण्याची धमकी, एक जण ताब्यात
Breaking News | Sangamner Crime: आपण अयोध्येला जात असून कोणी अडवले तर फायरींग करील, अशी धमकी दिल्याचा प्रकार.
संगमनेर: आपण अयोध्येला जात असून कोणी अडवले तर फायरींग करील, अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. डायल ११२ या सुविधेवर संगमनेरातील एका इसमाने फोन करून ही धमकी दिली. यामुळे पोलिसांनी ताबडतोब शोध मोहीम राबवून त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकदम खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवार दि. १७ रोजी पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास शहर पोलिसांचे डायल ११२ क्रमांकाचे वाहन गस्तीवर रात्रपाळीच्या असतानाच अहमदनगरच्या नियंत्रण कक्षाकडून वरील धक्कादायक संदेश प्राप्त झाला. संगमनेरातील जनतानगरच्या गल्ली क्र. १ मध्ये असलेल्या सरस्वती वसाहतीमधून नियंत्रण कक्षाला हा कॉल करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित इसमाने आपल्याकडे दोन बंदुका असल्याचे व आपण परवा अयोध्येला जात असल्याचे पोलिसांना फोन करून सांगितले. यावेळी आपणास काही झाल्यास अथवा आपला रस्ता अडवल्यास अयोध्येत जाऊन फायरींग करण्याची धमकी दिली.
त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब फोन करणाऱ्या इसमाच्या ठिकाणाचा ठावठिकाणा शोधून जनतानगरच्या गल्ली क्र. ३ मध्ये छापा घातला. यावेळी डायल ११२ क्रमांकावर फोन करणारा योगेश नारायणसिंग परदेशी याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. दिवसभर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो मद्यपी असल्याचे आणि त्याने नशेत पोलिसांना फोन करुन नाहक खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भारतीय दंडसंहितेच्या कलम १८२, १८८, १७७ सह दारुबंदी कायद्याचे कलम ८५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांया मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी हे करत आहे.
Web Title: Threat of shooting in Ayodhya from Sangamner crime filed
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News