संगमनेर: थोरात साखर कारखान्याची निवडणूक जाहीर, विखे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
Sangamner Factory Election: निवडणूक कार्यक्रमानुसार 11 मे 2025 रोजी मतदान होणार असून 12 मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार.
संगमनेर: येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक 2025-30 साठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 11 मे 2025 रोजी मतदान होणार असून 12 मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात 3 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मिळणार व स्वीकारण्यात येणार आहे.
प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर उमेदवार 15 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात. माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 2 मे रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याची प्रारूप मतदार यादी 25 फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी 19 मार्च, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.
संगमनेर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आव्हान दिले आहे. यावेळी विखे या निवडणुकीत कोणती रणनीती आखणार आणि थोरात तिला कस उत्तर देतात या चर्चेने संगमनेर मध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेचे आमदार अमोल खताळ सक्रीय झाले असून निवडणूक पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक सभासदांची बैठक घेतली आहे.
Web Title: Thorat Sugar Factory election announced