अहिल्यानगर: तलाठ्याचा खासगी एजंट लाचलुचपतच्या जाळ्यात
Ahilyanagar Bribe Case: वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी घेतली लाच.
कोपरगाव : बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याच्या बदल्यात वीस हजारांची लाचेची मागणी कोपरगाव तालुक्यातील धारणगावच्या तलाठ्याने केली. वीस हजार रुपयांची लाच घेताना खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच मागणारा तलाठी फरार आहे.
कोळपेवाडी येथील वाळू व्यावसायिकाला धारणगाव येथील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यासाठी तलाठी धनंजय गुलाब पन्हाड (वय ३५) याने वीस हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर वाळू व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा तलाठी पन्हाड याने स्वतः साठी १० हजार व मंडळ अधिकारी पोकळे यांच्यासाठी १० हजार, अशी एकूण वीस हजार रुपयांची मागणी केली. दि. ६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचण्यात आला. कोपरगाव शहरातील बसस्टँडजवळ तलाठी पन्हाड यांच्या सांगण्यावरून सागर ऊर्फ बबलू सुरेश चौधरी (वय २७, रा. धारणगाव) याने लाच स्वीकारली. पंचासमक्ष लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
आपला एजंट पकडला गेला असल्याची माहिती मिळताच, तलाठी फरार झाला आहे. याप्रकरणी तक्रारदार वाळू व्यावसायिकाने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. ७) सकाळी सहा वाजता फिर्याद दिली.
Web Title: Talathi’s private agent caught in bribery trap