टी. एन. कानवडे यांना पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार
Breaking News | Akole: टी. एन. कानवडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
अकोले: तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे सचिव, अॅड. मनोहरराव देशमुख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य टी. एन. कानवडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
टी. एन. कानवडे यांनी सन १९९३-९४ पासून आदिवासी भागातील राजूर येथील देशमुख महाविद्यालयात प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. २३ वर्षाच्या प्राचार्य पदाच्या काळात त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व सामाजिक कामात वेगवेगळे उपक्रम राबविले. याचाच परिपाक म्हणून या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय तर प्राचार्य कानवडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शासनाच्या वनविभागाने त्यांना वनश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने प्राचार्य कानवडे यांनी केलेल्या आदिवासी भागातील सेवेबद्दल त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मान केला होता. पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्री श्री पंडित रविशंकर यांच्या हस्ते प्राचार्य कानवडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
Web Title: T. N. Kanwade Pune University Lifetime Achievement Award
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study