दुर्दैवी घटना: वादळी वाऱ्याने भिंत कोसळून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीची भिंत वादळी वाऱ्याने कोसळल्याने सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर तीन मजूर जखमी झाले आहेत. बांधकाम करीत असलेल्या सर्व भिंती वादळाने कोसळल्याची घटना रविवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.
आरव भाऊसाहेब इंगावळे वय ६ असे मृत झालेल्या मुलांचे नाव आहे. कोरगाव येथे साकळाई वस्तीवर गोरख तान्याबा इंगावले यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. सिंगल विटांचे बांधकाम सुरु होते. रविवारी दुपारी जोरदार वारा सुटल्याने दहा फुट बांधलेल्या चारही बाजूंच्या भिंती कोसळून तीन मजूर किरकोळ जखमी झाले तर त्या ठिकाणी आरव हा चिमुकला खेळत होता. वारा व पाउस आल्याने तो आडोशाला उभा राहिला मात्र त्याच्या अंगावर भिंत कोसळल्याने विटांच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मुलगा कोठे गेला याचा काही वेळाने शोध घेतला असता तो विटांच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. याबाबत पोलीस पाटील बाळासाहेब लंके यांनी पोलिसांना माहिती दिली.
Web Title: Shrigonda six-year-old boy died when a wall collapsed due to strong winds