चाकूचा धाक दाखवून शाळकरी मुलाचे अपहरण
Shrigonda: कारमध्ये बसवून अपहरण (abducted), मुलाने चालत्या कारमधून मारली उडी.
श्रीगोंदा: तालुक्यातील आनंदवाडी (अजनूज) येथील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या समर्थ गणेश यादव या विद्यार्थ्याचे दोघांनी चाकूचा धाक दाखवत कारमध्ये बसवून अपहरण केले. मुलाने धावत्या कारमधून उडी मारली. त्यानंतर पुढे कार अडवून नागरिकांनी दोघांना बेदम चोप देऊन टाकली. पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना बुधवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास आनंदवाडी शिवारात घडली.
श्रीगोंदा पोलिसांनी नासीर गुलाब पठाण (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), हरिभाऊ दत्तू वाळुंज ( रा. पिंपळगाव तुर्क, ता. पारनेर) यांना अटक केली. त्यांची कारही पोलिसांनी जप्त केली.
अजनूज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव (वय ११) हा काष्टी येथील जनता विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी ९:३० वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी अजनूज चौकात येऊन थांबला. त्याच्याजवळ विना क्रमांकाची कार येऊन थांबली. नासीर पठाण याने कारमध्ये बस आम्ही तुझ्या पप्पांचे मित्र आहोत असे म्हणत त्याला कारमध्ये बसविले. आणखी दोघा अनोळखींना कारमध्ये बसवून त्यांना गणेशा व माळवाडी येथे सोडले. समर्थ याला पुढे घेऊन जात असताना खरातवाडी येथे हरिभाऊ दत्तू वाळुंज याने कारमध्ये असलेला चाकू दाखवून आरडाओरडा केला तर चाकू पोटात खुपसील, असा सज्जड दम दिला. त्यानंतर पुढे मोठा खडडा आल्याने कारचा वेग कमी झाला. त्यामुळे समर्थने कारमधून बाहेर उडी घेतली.
समर्थने रस्त्यालगत असलेल्या अशोक वाघमोडे यांच्या घरी जाऊन माझ्या वडिलांना फोन केला. आनंदवाडी येथील महेंद्र गिरमकर यांना वाहनाबाबत माहिती दिली. काष्टी, सिद्धटेक रस्त्यावरील आनंदवाडी फाटा येथे महेंद्र गिरमकर आणि दहा ते पंधरा सहकाऱ्यांनी कार अडविली. चौकशी केली असता त्या कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत तरुण आढळून आले. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी करत कारची तपासणी केली असता त्यामध्ये चाकू, दारूच्या बाटल्या, ग्लास, आठ ते दहा वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट, महाराष्ट्र शासन नाव असलेल्या पाट्या मिळून आल्या.
मुलाचे वडील गणेश विठ्ठल यादव यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Schoolboy abducted at knifepoint