संगमनेर: चंदनापुरी घाटात बस चालकाला मारहाण
Sangamner Crime: चंदनापुरी घाटात बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
संगमनेर: तालुक्यातील चंदनापुरी घाटात बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैभव एकनाथ साबळे हे अकोले आगारातील बस चालक शनिवारी दुपारी अकोले आगाराची बस (क्रमांक एम. एच. 14 बी टी 4585) ही घेऊन अकोले ते पुणे संगमनेर मार्गे जात होते.
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चंदनापुरी घाटात बस चालवित असताना या बससमोर मुरबाड डेपोची बस नं. एम. एच. 14 बी टी 1393 ही चाललेली होती. सदर बसला दोन मोटार सायकल डिस्कव्हर नं. एम. एच. 02 सी यू 5232 वरील इसम अमोल रावसाहेब घुले व पल्सर मोटारसायकल नं. एम. एच. 14 जी. के. 4892 वरील दोन अनोळखी इसम यांनी मुरबाड डेपोच्या बसला पुढेे जाण्यासाठी जागा देत नव्हते. बस चालकांनी हॉर्न वाजवून त्यांना बाजुने वाहन चालविण्याचा इशारा केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
मुरबाड डेपाच्या बस चालकाला मोटारसायकल वरील इसम हे शिवीगाळ करत होते. चालक साबळे यांनी आपल्या ताब्यातील बस साईडला घेतली असता सदरच्या मोटारसायकलवरील इसमांनी त्यांच्या मोटारसायकल साबळे यांच्या बससमोर आडव्या लावून त्यांना शिवीगाळ केली. यावेळी मुरबाड डेपोची बस पण तेथे आली. त्या बसला पण मोटारसायकल वरील इसमांनी थांबवून त्या ड्रायव्हरला व वाहकाला ही शिवीगाळ करू लागले.
साबळे यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता या युवकांनी साबळे यांना बसमधून खाली ओढून लाथाबुक्क्याने मारहाण केली. या मोटरसायकलस्वारांनी मुरबाड येथील चालक व बसमधील एका प्रवाशालाही शिवीगाळ व दमदाटी केली. बस चालक साबळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मोटरसायकल चालकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner Crime Bus driver beaten up in Chandnapuri Ghat
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App