अखेर त्या बलात्कारी नराधमाला फाशीची शिक्षा
मुंबई | Sakinaka rape and murder Case: मुंबईत झालेल्या एका बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबई येथील साकीनाका परिसरात 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री ही घटना घडली होती. आरोपीने एका मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केली होती. ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली होती.
आरोपी नराधम मोहन चौहान याने ‘त्या’ मुलीची हत्या करून तिला जखमी अवस्थेत तिला तसेच सोडले होते. त्या मुलीला जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी पीडितेने आपले प्राण सोडले होते.
बलात्कारी आणि खुनी आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करताच नराधम ढसाढसा रडू लागला
मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानं संपूर्ण मुंबई हादरली होती. गणेश चतुर्थीच्याच दिवशी हा प्रकार घडला होता. याप्रकरणातील नराधम आरोपी मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं होतं. 346 पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हे कृत्य पूर्वनियोजित नव्हते असा निष्कर्ष काढत पोलिसांनी हा तपास तातडीनं पूर्ण केला. या आरोपपत्रात एकूण 37 जणांचे जबाब नोंदवले असून अॅट्रॉसिटी, बलात्कार (Rape) आणि हत्या (Murder) प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करुन तपास पूर्ण करण्यात आल्याचं पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याच आधारावर आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवत असल्याचं सोमवारी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले असून काल (1 जून 2022) मोहनच्या शिक्षेवर युक्तिवाद झाला. आज दिंडोशी सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
Web Title: Sakinaka rape and murder Case