अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट, विजांचा कडकडाट
Ahmednagar Rain: वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली. विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आणि वादळामुळे अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत.
अहमदनगर: जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली. विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आणि वादळामुळे अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत झाला होता. या पावसाने शेतातील कांदा, हरभरा, गहू, वाटाणा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच वारेही जोरदार वाहत होते. सायंकाळनंतर जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. कोतूळ, भोळेवाडी, पिसेवाडी परिसरात जोरदार गारपीट झाली. यामुळे कांदा, गहू उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. राजूर परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
श्रीरामपूर शहर व परिसरात काल सोमवारी दुसर्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची चिंता वाढविली आहे. उक्कलगाव, बेलापूर व अन्य भागातही अवकाळी पावसाने तडाखा दिला.त्यामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. चिंच, आंबा पिकालाही फटका बसला आहे. राहुरीच्या पूर्वभागातील वळण, वळणपिंप्री, पाथरे खुर्द, मांजरी भागात रात्री 9 ते 10 या कालावधीत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, खरबूज, तरबूज आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
नेवासा तालुक्यातील चांदा, बर्हाणपूर परिसरात अवकाळीचा जोरदार तडाखा बसला असून चांद्याच्या काही भागात गाराही पडल्या तर भालके वस्तीवर नारळाच्या झाडावर वीज कोसळली. काल सायंकाळी सातच्या दरम्यान जोरदार वादळी वार्यासह अचानक अवकाळी पाऊस या परिसरात सुरू झाला.
विजांचा कडकडाट होता. काही ठिकाणी गाराही पडल्या तर चांदा लोहारवाडी रोडवर भालके वस्ती येथील संजय अण्णासाहेब भालके याच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडली. नारळाने पेट घेतला होता या पावसाने या परिसरात शेतकर्याचे प्रंचड नुकसान झाले असून काढणीस आलेला गहू हरभरासह कांदा आणि इतर नकदीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील काही गावांमध्ये सोमवारी (दि.6) सायंकाळी अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेतमालाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील कान्हुरपठार, किन्ही, बहिरोबावाडी यासह इतर शेजारील गावांमध्ये सोमवारी सायंकाळी गारपीट झाली. यात कांदा, ज्वारी, हरभरा, गहू या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत आहे. अनेक ठिकाणी गहू पिक भूईसपाट झाले.
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील आश्वी परिसरातही वादळी वारे, ढगांचा गडगडाटात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. राहाता तालुक्यातील पुणतांबा, कोपरगाव तालुक्यातील दहिगाव परिसरातही विजांच्या कडाकडाटात हलका पाऊस पडला.
पारनेर तालुक्यात किन्ही, पारनेर, निघोज, शिरापूर, चौभूत, हिवरे कोरडा, माळकूप, पाडळी, भाळवणी, गोरेगाव, बहिरोबावाडी परिसरात गारपीट झाली. कान्हूरपठार येथे किन्ही रस्त्यावर असलेल्या अन्वर शेख यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडून झाड जळाले. जवळे परिसरात रात्री आठ वाजल्यापासून सुमारे अर्धा तास पाऊस होता.
Web Title: Rain, hail, lightning with a gale in Ahmednagar
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App