अकोले ते विरगाव फाटा रस्त्यावर ठीकठिकाणी खडडेच खड्डे, आंदोलनाचा दिला ग्रामस्थांनी इशारा
अकोले | Akole: अकोले ते वीरगाव फाटा या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टया मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत.वारंवार अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या कड़े विनंती, लेखी अर्ज, करुन लोक कंटाळले आहे. लोकांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. येत्या आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे व साईड पट्ट्यांचे काम केले नाही तर तांभोळ ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अकोले ते बाजार समिती मार्गे वीरगाव फाटा या रस्त्या संदर्भात अनेक वेळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्या कानावर या परिसरातील ग्रामस्थ, त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न घातला मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे लोकप्रतिनिधी यांचे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आता पहावयास मिळत आहे.
मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन वाहनचालक घराबाहेर पडत असतात. सुगाव येथील ऑक्सिजन कोविड सेंटरला तसेच मधला मार्ग म्हणून सिन्नर, नाशिकला याच रस्त्याचा वापर करावा लागतो.रुग्णवाहिका अत्यवस्थ रुग्ण घेउन येता जातांना लोक पाहत असतात. अकोले पासून मोठ्या पुलाच्या पुढील बाजू पासून ते वीरगाव फाटा,पुढे गणोरे, देवठाण,समशेरपूर ला याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मोठ्या प्रमाणात वर्दळ या रस्त्यावर असते.
अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे. तोच या रस्त्यावर जागोजागी असंख्य खड्डे पडले आहेत. छोटे मोठे अपघात ही नित्याचीच बाब या रस्त्यावर बनली आहे. तरी सुद्धा लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे कोणतेही गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे दुचाकी-चारचाकी वाहन चालक त्रस्त झाले आहेत. दोन मोठी वाहने या रस्त्यावरून एकाच वेळी ये जा करतांना वाहनचालकांची भांडणे परिसरातील लोकांना पहावयास मिळत आहे.कारण साईड पट्ट्या पूर्ण पणे खचल्याने रस्त्यावरन खाली कोणी उतरायचे यावरून वाद होत असतात. या रस्त्याचे साईड पट्टी पूर्ण पणे खचल्या आहेत आणि रस्त्याला डांबरी रस्ता म्हणायचा की खेड्यातील वाडी वस्तीवर जाणारा रस्ता म्हणायचा असा प्रश्न लोकांसमोर निर्माण झाला आहे.
या सर्व कारभाराला वैतागून या रस्त्याच्या प्रश्नी दिनांक 28 जून 2021 रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तांभोळ चे माजी सरपंच मंगेश कराळे ,आर पी आय तालुका उपाध्यक्ष संदीप शिंदे ,भाजपचे कार्यकर्ते वाल्मीक नवले, प्रतिक नवले अरुण हरनामे, माजी सरपंच युवराज चव्हाण, सुनील माने, ताराचंद माने, ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांना दिला आहे.
अकोले ते बाजार समिती पर्यन्तच्या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी संबंधित विभागाने माती मिश्रित मुरूम व खडी वापरली. तात्पुरत्या कामामुळे लोक खुश झाले, लोकप्रतिनिधी यांचे मुळे हे काम सुरू झाल्याचे फोटो सोशल मीडियावर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फिरवले.मात्र त्यानंतर झालेल्या एक दोन पावसातच या रस्त्यावर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी यांनीही पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाचे उत्तर देतांना काम मार्गी लागेल व पुन्हा या रस्त्याची चर्चा होणार नाही असे अधिकाऱ्यांना सूचना केल्याचे निदर्शनास आणून दिले होते. परंतु सार्वजनिक विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे ऐकत नाही, त्यांनी सांगितलेल्या सुचनांकडे काना डोळा करत असल्याचे व प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी अशा सर्वच कार्यकर्त्यांवर आता आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
Web Title: potholes on the road from Akole to Virgaon Fata