अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल
Molestation of a Minor girl: छेड काढल्याप्रकरणी नगर तालुका तिघांविरूध्द नगर ठाण्यात गुन्हा.
नगर: शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी नगर तालुका तिघांविरूध्द नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका गावातील पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. शनिवारी दुपारी ही घटना घडली.
वैभव वखरे (रा. नवीन दहिफळ ता. शेवगाव), नंदू कातोरे (रा. कामरगाव ता. नगर) व किशोर पंडीत (रा. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील वैभव व किशोर यांना पोलिसांनी अटक केली.
नगर तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी सुपा येथील शाळेतून घरी जात असताना तिघांनी तिचा दुचाकीवरून पाठलाग केला. शिट्ट्या वाजवून छेड काढली.
हा प्रकार मुलीच्या भावाच्या लक्षात आला. यानंतरही पुन्हा तिघे जण मुलीच्या घराकडे आले. त्यावेळी मुलीच्या वडिल व भावांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. वैभव व नंदू पसार झाले. त्यांनी किशोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री वैभवला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.
Web Title: Molestation of a minor girl