मसाज सेंटरवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पाच महिलांची सुटका: Sex Racket
Pune Crime: अवैध देहविक्रीचं मोठं रॅकेट (Sex racket) पुण्यात सुरू, एका मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा (Prostitution business) पर्दाफाश, पाच महिलांची सुटका.
पुणे : काही दिवसांपूर्वी वारजे-माळवाडी येथे ओम स्पावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. त्यानंतर आता आणखी एका मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे.
वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फातिमानगर भागातील क्लिओज स्पा अँड सलून या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत पाच महिलांची सुटका केली आहे. तर श्रीधर मोहन साळुंखे (वय ४२, पवळे चौक कसबा पेठ) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फातिमानगर परिसरातील क्लिओज स्पा अँड सलून याठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध प्रकारे देहविक्री व्यवसाय सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने याठिकाणी छापा टाकला. छापा टाकल्यावर पोलिसांना सदर ठिकाणी ५ महिला देहविक्री करत असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी तातडीने या महिलांची सुटका केली आणि स्पा मालक श्रीधर साळुंखे याला अटक केली. अवैध प्रकारांना आळा घालण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
आरोपी साळुंखे याने पैशाचे आमिष दाखवून या महिलांना या स्पा सेंटरमध्ये काम दिले होते. तर आणखी पैशाचे आमिष दाखवत तो या पाचही महिलांकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Massage center raided, sex racket busted, five women freed
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App