महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजले; एका टप्प्यात होणार मतदान
Maharashtra Assembly Election 2024 declared: २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार.
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभा निवडणुक होणार असून राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच निवडणूक आयोगाने झारखंडच्याही विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.
यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या मतदारांचे आभार. दोन्ही राज्यांमध्ये उत्साहात मतदान झाले. काही दिवसांपूर्वी आम्ही महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भेट दिली होती. आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. यात महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून २८८ जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार असून यात ४ कोटी ६४ लाख महिला तर ४ कोटी ९७ लाख पुरुष मतदार आहेत. तसेच ६ लाख ३२ हजार दिव्यांग तर ८५ वर्षांवरील १२ लाख ८४ हजार मतदार आहेत. तसेच २० कोटी ९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार असून यात १ कोटी ८५ लाख तरुण मतदार आहेत, असे त्यांनी म्हटले.
निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र असणार असून शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत. तसेच निवडणुकीचे नोटीफीकेशन २२ ऑक्टोबरला निघणार असून उमेदवारांना २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील २८८ पैकी २३४ जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ व २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत, असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की, मतदानाच्या रांगेत काही खुर्च्या असतील, तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रांवर असेल. तर ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यासाठी आमचे अधिकारी त्यांच्या घरी जातील. सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे ३ वेळा जाहीरात द्यावी लागेल. तर सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. २ किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल, असे राजीव कुमार यांनी म्हटले.
निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावणार आहेत.
Web Title: Maharashtra Assembly Election 2024 declared
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study