अकोलेतील धककादायक घटना! बिबट्याने तीन वर्षीय चिमुकलीला उचलून नेले, ऊसाच्या शेतात मृतदेह
Breaking News | Akole: अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने झडप घालत उचलून नेले. यात मुलीचा मृत्यू झाल्याची घटना.

अकोले: नागरी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून हल्ले केल्याच्या घटना वाढत आहेत. अशातच अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने झडप घालत उचलून नेले. यात मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील देवठाण गाव शिवारात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण गावातील शेळके वस्ती परिसरात सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत कविता लहानु गांगड (वय ३) या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यापूर्वीही मे महिन्यात देखील देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात विठावाई काळे या ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
शेळके वस्ती परिसरात काल सायंकाळी घराच्या अंगणात खेळत कविता हि चिमुकली खेळत होती. याच वेळी बिबट्याने चिमुकलीवर हल्ला करत तिला उचलून नेले. यानंतर बिबट्या शेताच्या दिशेने पसार झाला होता. दरम्यान वस्तीतील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड करत बिबट्याच्या मागे धावत पाठलाग केला. मात्र बिबट्या उसाच्या शेतात शिरला होता.
वस्तीतील नागरिकांनी शोध घेतला असता मृतदेह ऊसाच्या शेतात सुमारे ३०० मीटर अंतरावर आढळून आला. मुलीचा मृतदेह पाहून तिच्या आईने एकच आक्रोश केला. वारंवार बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अकोले तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. तर वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Breaking News: Leopard carries away three-year-old child, body found in sugarcane field
















































