राष्ट्रवादीला धक्का : आमदार वैभव पिचडयांच्या भाजप प्रवेश फायनल , अकोलेत पदाधिका-यांचे राजीनामे
अकोले : तालुक्यात घड्याळाच्या काट्यावर ‘कमळ ’ फुलणार हे पक्के ठरल्याने आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारी अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात तालुक्यातील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपवासी होण्याचा सूर आळवला. बैठक संपताच कार्यकर्त्यांचे आपआपसात ‘जय श्रीराम’ सुरु झाले.
अकोले तालुक्यातील सर्व खोऱ्यातील कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक झाली. शनिवारच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार पिचड यांच्या पक्ष बदलाची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला आ.पिचड शिवबंधनात अडकणार असा सूर होता. तालुक्यातील ज्येष्ठांनी सेनेपेक्षा मग राष्ट्रवादीच बरी असा धोशा पुढे केला. यावर जेष्ठ व तरुणाईचा मध्य साधत भाजपमध्ये प्रवेश केल्यास तालुक्यातील प्रलंबित विकास कामांना न्याय व गती मिळेल, असा मत प्रवाह पुढे आला. भाजपात जाण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला आहे. शनिवारी आखाड पार्टीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या होणाºया महामेळाव्यात त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, मधुकर नवले, गिरजाजी जाधव, जे.डी.आंबरे, यशवंत आभाळे, मीनानाथ पांडे, अॅड.के.डी.धुमाळ, नगराध्यक्षा संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, विठ्ठल चासकर, आशा पापळ, शंभू नेहे, रमेश देशमुख, राहुल देशमुख, कल्पना सुरपुरिया, चंद्रकला धुमाळ, राजेंद्र डावरे, सुनील दातीर, सुरेश गडाख, भाऊसाहेब येवले, अरुण शेळके, रावसाहेब वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, अशोक देशमुख, विक्रम नवले, कवीराज भांगरे, भूषण जाधव, कैलास जाधव, कचरु शेटे, भानुदास गायकर, नामदेव पिचड, परशुराम शेळके, विजय पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार पिचड यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेची राळ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून उठली होती. आमदार पिचड गेली महिनाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. सव्वा महिन्यानंतर दोन दिवसांपूर्वी ते अकोलेत आले होते. त्यांना पक्ष बदलाविषयी छेडले असता ‘आता फक्त भगवा शर्ट घालायचं बाकी ठेवलंय…’ असा उपरोधिक टोला लगावत पक्ष बदलाच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला होता. मात्र दोन दिवसातच पक्ष बदलाची सूत्रे फिरली. अकोेले तालुक्यातील प्रलंबित विकास कामांना गती मिळण्यासाठी त्यांनी भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीने आमदार पिचड व त्यांच्या समर्थकांची पक्ष बदलाबाबत वाटाघाटीची चर्चाही झाली आहे. गेल्यावेळी भाजप-सेनेची युती नव्हती, तेव्हा अकोलेची जागा सेनेला हा दावाही कार्यकर्त्यांनी खोडून काढत ही जागा भाजपच्या वाट्याला येणार असे भाजपच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘निळवंडे-पिंपळगाव खांड’ या पाण्यातून संघर्ष करण्यापेक्षा भाजपात जाऊन प्रश्न सोडवून घेण्यासाठी नवा घरोबा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड हाच तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष असून पिचड यांनी घेतलेल्या निर्णयाचे तालुक्यातून स्वागत होत आहे. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाºयांनी जिल्हाध्यक्षांकडे पद व सभासदत्वाचे राजीनामे शुक्रवारी सकाळी पाठविले आहेत. येत्या विधानसभेला तालुक्यात कमळ फुलेल’ असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी सांगितले.
‘भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षात येत असलेल्या सर्वांचे स्वागतच आहे. येणाºया सर्वांना सन्मान दिला जाईल. गतवेळी सेना, भाजपची युती नव्हती तेव्हा ही जागा सेनेला हे म्हणणे उचित ठरणार नाही. अकोलेची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. वाटाघाटीत अकोलेची जागा भाजपला निश्चित मिळेल. आमदार भाजपचा राहील, असे भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी सांगितले.
Website Title: Latest News NCP Shocks: BJP Entry Final Of MLA Vaibhav Pichadi, Resignation Of Akole Office Bearers