‘मनोज जरांगे यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार’, मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांची आज मुस्लिम आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरुंसोबत महत्त्वाची बैठक पार पडली.
Manoj Jarange Patil: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज मुस्लिम आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरुंसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जायचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील आणि दोन्ही धर्माच्या धर्मगुरुंनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात आला? या विषयी सविस्तर माहिती दिली.
मनोज जरांगे पाटील येत्या 3 नोव्हेंबरला उमेदवारांची घोषणा करणार आहेत. आपण सांगू त्या उमेदवाराला निवडून आणायचं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. यावेळी मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मोठा दावा केला. “मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहे”, असं वक्तव्य सज्जाद नोमानी यांनी केलं.
“जरांगे मला मराठी शिकवतील. पण ते मला मराठी शिकवतील. केवळ हिंदी बोलता येत नसल्याने जरांगे हरियाणात गेले नाही. त्यांना तिकडून बोलणं आलं होतं. त्यांना इतर ठिकाणीही बोलावलं होतं. मी आता त्यांच्यासोबत देशभर जाईल. त्यांचं मराठी भाषण हिंदीत अनुवादीत करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहे. पाटील यांच्या रुपात भारताला नवे बाबासाहेब आंबेडकर मिळणार आहेत. पाटील यांच्या रुपात नवे मौलाना आझाद मिळणार आहे”, असं मोठं वक्तव्य सज्जाद नोमानी यांनी केलं.
“देश कठीण परिस्थितीतून जात आहे. अनेक आव्हाने आहेत. देशातील लोक विभाजीत झाले तर विदेशी ताकदीचा मुकाबला करता येणार नाही. देशात फूट पाडणाऱ्या ताकद आहेत. त्या सत्तेत आहेत. त्या विदेशी शक्तीच्या एजंट आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर देशाला विभाजित केलं जात आहे. फोडा आणि राज्य कराचा जुनाच फॉर्म्युला वापरला जात आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचं राज्य आहे. आर्थिक राजधानी इथेच आहे. पण राज्यातील भांडवल गुजरातला नेलं जात आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा सवाल आहे. राज्याचा इतिहास प्रेम आणि सद्भावनेचा आहे. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे इनचार्ज इब्राहीम खान होते”, असं सज्जाद नोमानी म्हणाले.
“भाजप आणि संघाने धर्माच्या नावावर वाद निर्माण केले. सर्व धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी देशवासियांमध्ये फाळणी केली. गेल्या ४० वर्षापासून मी संपूर्ण देशात गरीब, मुस्लिम, एससी एसटी, महिला, शेतकरी या सर्वांना मी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही ते यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणूक सर्वाना एकत्रित घेऊन लढण्यासाठी तयारी सुरु असल्याचे समोर येत आहे.
Web Title: India will get a Gandhi in the form of Manoj Jarange
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study