पावसाचा हाहाकार, पुण्यात आर्मी, पूर पीडितांच्या मदतीसाठी 85 जणांची टीम तैनात
Breaking News | Pune Heavy Rains: पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला, जनजीवन विस्कळीत झाले. पुण्यात पावसाचे चार बळी; अंडा भुर्जीच्या स्टॉलवरील तिघांना शॉक, तर भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू
पुणे : पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाकडून कशाप्रकारे बचावकार्य सुरु आहे, याचा आढावा घेतला आहे. तसेच आता नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देण्यासाठी टीम सज्ज करण्यात आली आहे.
तसेच लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील. एकूण 85 जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत. पुण्यात पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Web Title: Heavy rains, Army in Pune, 85-member team deployed to help flood victims
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study