स्वतःच लपून बसला, अपहरणाचा बनाव केला
Breaking News | Ahilyanagar: विरोधकांना अडकविण्यासाठी एकाने अपहरणाचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले हातवळण येथील घटना : खोटी फिर्याद.

अहिल्यानगर : अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल होत असतात. मात्र, काहीजण अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करून पोलिसांची दिशाभूल करतात. मारहाण झाल्यानंतर विरोधकांना अडकविण्यासाठी एकाने अपहरणाचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या पत्नीसह नातेवाईकांविरोधात खोटा गुन्हा दाखल केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली.
शेतजमिनीच्या वादातून हातवळण (ता. अहिल्यानगर) येथे २५ ऑक्टोबरला तुकाराम महादेव यादव याला मारहाण करून त्याच्या दुकानाची तोडफोड केली. याप्रकरणी तुकाराम यादव याच्या पत्नीने नगर तालुका पोलिस ठाण्यात मारहाण करून जीवे ठार मारण्यासाठी पतीचे अपहरण झाले आहे, अशी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गणेश काकडे, माऊली पठारे, सुनील पठारे आणि अक्षय भंडारे (सर्व रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा) अशा चार जणांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात तुकाराम यादव हा फोनवरून त्याच्या पत्नीच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक विश्लेषणात समोर आले. पोलिसांना संशय आला. त्यांनी तुकारामच्या नातेवाईकांवर नजर ठेवली. ते रात्रीच्यावेळी शेंडी परिसरात जात होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांचा पाठलाग केला असता ते
तुकाराम यादवला भेटण्यासाठी शेंडीला जात होते. तो शेंडी येथील एकाच्या शेतात लपून बसल्याचे समोर आले. पोलिसांनी तुकारामला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याची तुकारामला कुणकुण लागली. पोलिसांना पाहताच तो पसार झाला. पोलिसांनी पाठलाग करत तुकारामला ताब्यात घेतले. त्याने अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली. या कटात त्याला त्याची पत्नी व नातेवाईकांनही मदत केली. पत्नीने पतीचे अपहरण केल्याची खोटी फिर्याद दिल्याने तिच्याविरोधात पोलिसांनी फिर्याद दिली. त्यावरून पत्नी व इतर नातेवाईकांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मारहाण झाल्यानंतर तुकाराम गावातून पसार झाला. तो शेंडी शिवारातील एका डॉक्टरच्या शेतात लपून बसला होता. त्याचे नातेवाईक त्याला जेवणाचा डब्बा पुरवत होते. पोलिसांनी पाठलाग केला असता अपहरणाचा बनाव करणारा तुकाराम मिळाला. पोलिसांनी अपहरणाच्या बनावाचा भांडाफोड केला.
Breaking News: He hid himself, faked a kidnapping
















































