अहमदनगर: भजन सुरू असताना अचानक दोन गटात तुंबळ हाणामारी
Ahmednagar News: भजन म्हणणाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून संबंधित घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल.
राहुरी: राहुरी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवती अमावस्येनिमित्त भजन सुरू असताना अचानक दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. भजन म्हणणाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून संबंधित घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. गुहा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आज पुन्हा उफाळून आला असून अमावस्यानिमित्त सुरू असलेल्या पुजा व धार्मिक कार्यक्रमात एका समाजाच्या पुरूष व महिलांच्या जमावाने शिरून पुजारी व भाविकांना मारहाण केल्याने गुहा गावात तणाव निर्माण झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, गेल्या अनेक वर्षापासून गुहा येथील कानिफनाथ देवस्थानावरून दोन समाजात वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे. प्रशासनाने दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या अनेक वेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न ही केले. यावर दोन्ही समाजाला मान्य होतील असा तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला.
परंतू, आज दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अमावस्यानिमित्त पुजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला व भाविकांना दुसऱ्या समाजातील लोकांनी महिलांना बरोबर घेऊन धार्मिक ठिकाणी जाऊन जबर मारहाण केली. या घटनेमुळे गावात दोन समाजात चांगलाच तणाव निर्माण झाला असून या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला समजताच मोठा फौजफाटा गुहा गावात तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजते.
जवळपास वीस ते तीस लोकांचा जमाव एकमेकांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जमाव दाखल झाला आहे.
Web Title: Bhajan was going on, suddenly two groups clashed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App