अहिल्यानगर: दागिन्यांसाठी आजीचा गळा दाबून खून
Breaking News | Ahilyanagar Crime: सोन्याच्या मोहापायी ८० वर्षीय आजीचा गळा आवळून नातू व नातसुनेने खून केल्याची घटना समोर.

पारनेर : सोन्याच्या मोहापायी ८० वर्षीय आजीचा गळा आवळून नातू व नातसुनेने खून केल्याची घटना समोर आली आहे. गारगुंडी (ता. पारनेर) येथे रविवारी (दि. १६) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रभागा मल्हारी फापाळे (वय ८०) असे या घटनेतील मृत आजीचे नाव आहे.
खुनानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावरील दागिने व मोबाइल असा ३ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना काळेवाडी येथून जेरबंद केले. नातू तेजस शांताराम फापाळे व त्याची पत्नी वैष्णवी तेजस फापाळे अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पंढरीनाथ मल्हारी फापाळे (वय ६०, रा. गारगुंडी) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रविवारी दुपारी दोन वाजता चंद्रभागा फापाळे या घरी एकट्याच होत्या. त्यावेळी आरोपी तेजस फापाळे व वैष्णवी फापाळे यांनी दागिन्यांच्या मोहापायी गळा दाबून त्यांचा खून केला. मृत आजीच्या हातावर जखमा आढळून आल्या. आजीच्या अंगावरील दागिने व मोबाइल असा एकूण ३ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींनी लंपास केला होता.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्यासह पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपासाची चक्रे फिरवली. या घटनेतील आरोपी तेजस फापाळे व त्याची पत्नी वैष्णवी फापाळे यांना काळेवाडी येथून अटक केली. दरम्यान, टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आजीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन खंडागळे व उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ अधिक तपास करीत आहेत.
आरोपीवर चोरीचे गुन्हे
आजी घरी एकटीच असताना रविवारी दुपारी दोन वाजता आरोपींनी घरात प्रवेश केला. दागिन्यांसाठी आजीचा गळा दाबून खून केला. आरोपींचे येताना व जातानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याआधारे पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश करीत दोन्ही आरोपींना जेरबंद केले. तेजस फापाळे याच्यावर सोयाबीन, ट्रॅक्टर चोरीसह इतर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Breaking News: Grandmother strangled to death for jewelry
















































