अहिल्यानगर: दोन वाहनाच्या धडकेत बालिकेचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: हिवरेझरे (ता. अहिल्यानगर) परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात 6 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला.

अहिल्यानगर: अहिल्यानगर- दौंड रस्त्यावरील काळेवाडी, हिवरेझरे (ता. अहिल्यानगर) परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात 6 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात चारचाकी वाहनचालकांविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी (8 ऑक्टोबर) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास माऊली किराणा दुकानासमोर, काळेवाडी, हिवरेझरे येथे दोन अज्ञात चारचाकी वाहनांनी भरधाव वेगात येत रस्त्यावर चाललेल्या रूचीना नशीब काळे (वय 6, रा. काळेवाडी हिवरेझरे, ता. जि. अहिल्यानगर) हिला जोराची धडक दिली. पहिल्या वाहनाच्या धडकेनंतर दुसर्या चारचाकीने तिच्या दोन्ही पायांवरून जात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले; परंतु तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान अपघातानंतर दोन्ही वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले. याबाबत मृत बालिकेची आई पल्लवी नशीब काळे (वय 35, रा. काळेवाडी, हिवरेझरे) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस अंमलदार खेडकर करीत आहेत.
Breaking News: Girl dies in two-vehicle collision
















































