परदेशी तरुणीवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार; राजकीय कनेक्शनने खळबळ
Pune Crime News: मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर.
पुणे: पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे यासह इतरांचा समावेश आहे. भूतानवरून पुण्यात शिक्षण आणि कामासाठी आलेल्या महिलेशी आधी ओळख करून तिच्याशी जवळीक साधत कुकडे याच्या मित्रांनी विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी कुकडे याला 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती. मागील वर्षी या पदाधिकाऱ्याने पक्षातून राजीनामा दिला होता असं असलं तरी सुद्धा कुकडे विरोधात दोन्ही शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कुकडे हा अनेकांचे धर्मांतर करत असल्याचा आरोप केला होता, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कुकडे याच्या पुण्यातील नाना पेठेतील घराबाहेर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सुद्धा कुकडे याच्या बँकेत किंबहुना त्याच्या संस्थेत विदेशातून पैसे येत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
असं असताना आता कुकडे याच्याविरोधात 27 वर्षीय भूतानची रहिवासी असलेल्या एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात कुकडे याच्या 6 मित्रांना सुद्धा अटक करण्यात आली आहे, यात एक डीजे तर एक जण वकील आहे. 2020 मध्ये शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरी करण्यासाठी भारतात आलेल्या भूतान मधील या महिलेची ओळख या प्रकरणातील एका आरोपीशी झाली आणि त्याने तिची भेट कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे याने त्या महिलेला पुण्यात वास्तव्यास जागा दिली आणि इतर मित्रांशी सुद्धा ओळख करून दिली. या ओळखीचा फायदा घेत कुकडे आणि त्याच्या इतर मित्रांनी वेळोवेळी विविध ठिकाणी जाऊन पार्टीच्या निमित्ताने तिच्याशी जवळीक साधली आणि याचा गैरफायदा घेत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.
याप्रकरणी आता विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा माजी पदाधिकारी असला तरी सुद्धा त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी शिवसेना वेगळाच बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच कुकडे हा नाना पेठेत राहत असलेल्या ठिकाणी जी संस्था चालवत होता त्याची सुद्धा चौकशी करून त्या संस्थेच्या बँक खात्यात किती पैसे आहेत ते कुठून आलेत आणि त्या पैशाचा कुठे वापर झाला आहे याची चौकशींकरावी अशी मागणी करण्यात येतेय.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना काही गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये आणखी एक फिर्यादी समोर आली आहे. त्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार, शंतनू कुकडे हा मुख्य आरोपी आहे. पीडित महिला ही गेल्या चार-पाच वर्षांपासून शंतनू कुकडे याला ओळखत होती. शंतनू कुकडे हा पुण्यात एक संस्था चालवत होता. या संस्थेत शंतनू कुकडे याने पीडित तरुणीला राहण्यासाठी जागा दिली होती. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. एक-दोन वर्षांनी शंतनूचे मित्रही तिकडे येऊ लागले. हे सगळेजण अनेकदा बाहेरही जायचे. या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये शंतनू कुकडे याच्यासह 7 जण आरोपी आहे. पीडित तरुणी मूळची भूतानची आहे. काही वर्षांपूर्वी ती पुण्यात नोकरी आणि शिक्षणाच्या उद्देशाने आली होती. पुण्यात ती ऋषिकेशला भेटली. त्याच्यासोबतही तरुणीचे संबंध होते. ऋषिकेशने या तरुणीची ओळख शंतनूशी करुन दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Foreign girl sexually assaulted by 7 men