संगमनेरात बनावट खव्याचे पेढे विकणाऱ्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, ४०० किलो बनावट खवा जप्त
Breaking News Sangamner Raids: या कारवाईमध्ये १ लाख ११ हजार ४०० रुपये किंमतीचा ४०० किलो बनावट खवा जप्त.
संगमनेर : महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील धांदरफळ येथील यात्रेमध्ये बनावट खव्याचे पेढे विकणाऱ्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने काल बुधवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईमध्ये १ लाख ११ हजार ४०० रुपये किंमतीचा ४०० किलो बनावट खवा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या निमित्ताने काल बुधवारी सर्व महादेवाच्या सर्व मंदिरात मोठी गर्दी होती. या यात्रेमध्ये पेढ्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. यामध्ये बनावट खव्याचा वापर केला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला समजली होती.
ही माहिती समजताच अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे, प्रदिप पवार, सहाय्यक सागर शेवंते यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. धांदरफळ येथे जाऊन संबंधित दुकानावर छापा टाकला. या दुकानांमध्ये खवा सदृश पदार्थाचा वापर केला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
संबंधित दुकानदाराकडील मालाची तपासणी केली असता, पेढ्यासाठी वापरलेला खवा बनावट असल्याचे समोर आले. या पथकाने गुजरातमधून आलेला चारशे किलो बनावट खवा जप्त करुन त्याची विल्हेवाट लावली. या पदार्थांचे नमुने तपासण्यात येणार असून तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रदिप पवार यांनी सांगितले.
Web Title: Food and Drug Administration raids a shop selling fake khawi