अहिल्यानगर: फार्महाऊसवर घुसून तलवार, पिस्तुलाच्या धाकाने लूट
Breaking News | Ahilyanagar Crime: एका फार्महाऊसवर घुसून, मॅनेजरच्या डोक्याला पिस्तुल आणि मालकाच्या मानेला तलवार लावून 97 हजार 200 रूपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली.

अहिल्यानगर: घाणेगाव (ता. अहिल्यानगर) शिवारातील एका फार्महाऊसवर घुसून, मॅनेजरच्या डोक्याला पिस्तुल आणि मालकाच्या मानेला तलवार लावून 97 हजार 200 रूपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (13 ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (14 ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर उध्दव शिरसाठ (वय 40, रा. कौठा, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल प्रकाश मांढरे (रा. स्वास्थ हॉस्पिटलच्या पाठीमागे, लालटाकी, अहिल्यानगर), मनोज कराळे, ज्युनेद इनामदार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व पाच अनोळखी महिला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर शिरसाठ यांचे घाणेगाव शिवारात फार्महाऊस आहे. सोमवारी दुपारी राहुल मांढरे, मनोज कराळे, ज्युनेद इनामदार आणि त्यांच्यासोबतच्या पाच अनोळखी महिलांनी फार्महाऊसमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी फार्महाऊसचे मॅनेजर मयुर विलास जाधव यांच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्यांच्या खिशातील 2 हजार 200 रूपये रोख, गळ्यातील सुमारे 80 हजार रूपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर संशयित आरोपींनी ज्ञानेश्वर यांच्या मानेला तलवार लावून त्यांना फार्महाऊसवरून हाकलून दिले. जाताना संशयित आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फार्महाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर आणि हार्डडिस्कही चोरून नेली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून राहुल मांढरेसह इतर संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.
Breaking News: Farmhouse robbed at gunpoint, sword drawn
















































