माजी सैनिकाचा खून करुन गाडी पेटवली, हत्या केल्याचं उघडकीस
Nashik Murder Case: गाडीला कट मारल्यावरुन झालेल्या भांडणातून दुचाकीस्वारांनी त्यांची हत्या केल्याचं समोर आले.
नाशिक : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या माजी सैनिकाचे खून प्रकरणाचे गूढ उघडकीस आले आहे. गाडीला कट मारल्यावरुन झालेल्या भांडणातून दुचाकीस्वारांनी त्यांची हत्या केल्याचं समोर आले आहे. वादावादीनंतर चाकूने वार करत माजी सैनिकाचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याला गाडीत बसवून डिझेलने कार पेटवली, अशी कबुली संशियीत आरोपींनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या घोटी येथे दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळच्या सुमारास आंबेवाडी शिवारात रस्त्यावर एक जळालेल्या चारचाकी कारमध्ये एका अज्ञात मनुष्य जातीचे अवशेष जळालेल्या स्थितीत आढळून आले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असताना जळालेल्या गाडीची पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली असता ही गाडी संदीप पुंजाराम गुंजाळ, (रा. न्हनावे, ता.चांदवड) यांच्या मालकीची असल्याचे समजले या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डी.एन.ए. सॅम्पल घेण्यात आलेले होते. तपासात प्राप्त रासायनिक विश्लेषणानुसार घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान मयत संदीप पुंजाराम गुंजाळ हे माजी सैनिक होते. ते समृद्धी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी येथे सिक्युरिटीचे काम करत होते. दि. ३० ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते साउथ पोल समृद्धी महामार्ग येथून त्यांची सँट्रो कार घेऊन गेले होते व सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास त्यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पोलीसांच्या पथकाने मयत संदीप गुंजाळ हे सिक्युरीटी म्हणून काम करत असलेल्या समृद्धी महामार्ग साउथ पोल इगतपुरी या ठिकाणी भेट दिली.
समृद्धी महामार्गाचे कामगार, सिक्युरिटी गार्ड व ऑफीस स्टाफ यांच्याकडे मयत गुंजाळ यांच्याबाबत विचारपूस केली. त्यावेळी गुंजाळ हे 30 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या सँन्ट्रो कारने भावली धरण परिसराकडे गेल्याचे समजले. त्याप्रमाणे या कारचा मागोवा घेवून पोलिसांनी भावली धरण परिसरात माहिती घेतली असता घटनेच्या दिवशी मयत गुंजाळ हे गाडी चालवत असताना नांदगाव सदो येथील एका दुचाकीवरील इसमांशी कट मारल्याच्या कारणातून भांडण झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी नांदगाव सदो शिवारातून संशयित आकाश चंद्रकांत भोईर, (वय २४ वर्ष, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) व एक अल्पवयीन मुलगा, (रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) यांना ताब्यात घेवून गुन्ह्यासंदर्भात सखोल चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
सुमारे ६ महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गाचे पुलाखाली सांदगाव सदो गावाकडे स्प्लेंडर गाडीने जात असतांना समोरून एका सॅन्ट्रो कारने आम्हास कट मारला म्हणून त्यास आम्ही शिवीगाळ केली. त्यामुळे गाडी थांबवून खाली उतरुन त्याने आम्हाला शिवीगाळ केली व आमच्यात भांडण झाले. त्यामुळे आम्ही त्यास चॉपरने पोटावर वार करून जखमी करत ठार मारले व नंतर त्याला त्याच्याच गाडीत टाकून भावली धरणाचे दिशेने घाटात नेले. निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबविली. त्यावेळेस आम्ही त्यास ड्रायव्हर सीटवर बसवून त्याच्या गाडीत असलेले डिझेल अंगावर ओतून त्यास पेटवून दिले अशी कबुली संशयित आरोपींनी दिली.
Web Title: ex-soldier was murder and the car was set on fire
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App