अहमदनगर: मोटारसायकल अपघातात डॉक्टरचा मृत्यू
Ahmednagar News: प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.रामदास शिंदे यांचा मोटरसायकल अपघातात (Accident) मृत्यू झाल्याची घटना.
भेंडा: येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.रामदास भानुदास शिंदे (वय ५६ वर्षे) यांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पावन गणपती जवळ (नेवासा फाटा) घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळ सुरेगाव गंगा येथील रहिवाशी असलेले डॉ. रामदास शिंदे यांचे भेंडा येथे हॉस्पिटल असून तेथे ते वैद्यकीय व्यवसाय करतात. सुरेगाव मध्ये शेती असल्याने ते वरचेवर भेंडा ते सुरेगाव जाऊन-येऊन करत होते.
रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी ते भेंडा येथून सुरेगावला गेले असता संध्याकाळी सपत्नीक मोटरसायकल वरून भेंडयाकडे परतत असताना रात्री ८ वाजेची दरम्यान पावन गणपती जवळ समोरून आलेल्या भरधाव बुलेटने त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने झालेले अपघातात डॉ. शिंदे व त्यांच्या पत्नी गंभीररीत्या जखमी झाले.
दोघा उभयंतांना खाजगी रुग्णवाहिकेतून प्रथम नेवासा फाट्यावरील खाजगी रुग्णालयात व तेथून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी डॉ. शिंदे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. तसेच सौ. सिमा शिंदे या गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविण्यात आले. याबाबद नेवासा पोलीस ठाण्यात सीआरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. शिंदे हे लोणी येथील प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे 1984 च्या एमबीबीएसचे पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली,भाऊ असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी रशिया येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असून दुसरी मुलगी पुणे येथे शिक्षण घेत आहे. शव विच्छेदनानंतर सोमवार दि.९ एप्रिल रोजी दुपारी सुरेगाव येथे शोकाकुल वातावरणात डॉ. शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
Web Title: Doctor dies in a motorcycle accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App