Crime News: पोलीस उपनिरीक्षकालाच नऊ जणांनी केली बेदम मारहाण
पाथर्डी | Crime News: पाथर्डी शहरात शेवगाव रस्त्यावर सुट्टीला गावी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला नऊ जणांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. संदीप भगवान फुंदे (रा. फुंदेटाकळी ता. पाथर्डी) असे या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फुंदे मुंबई येथे पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सुट्टी असल्याने ते गावी आले होते. रविवारी दुपारी पाथर्डी शहरातील शेवगाव रस्त्यावरील आरूषी मेडिकल दुकानासमोर ते आपली चारचाकी (एमएच 01 बीजी 3977) रस्त्याच्या कडेला पार्क करत होते.
त्यावेळी पाठीमागे असलेल्या चारचाकीला (एमएच 16 एटी 2981) फुंदे यांच्या वाहनाचा धक्का लागला. वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील 17 हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ज्ञानदेव कोंडीराम केळगंद्रे, प्रकाश नामदेव केळगंंद्रे, सचिन गोरख केळगंद्रे, अक्षय ज्ञानदेव केळगंद्रे (सर्व रा. पागोरी पिंपळगाव ता. पाथर्डी), राहुल बापुराव त्र्यंबके, लतीफ शेख (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व तीन अनोळखी इसमांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे अधिक तपास करत आहेत.
Web Title: Crime News police sub-inspector was beaten to death by nine persons