उपसरपंचाला मारहाण: तुझ्यामुळे आम्हाला नदी पात्रातून वाळू भरता येत नाही
राहुरी |Crime News| Rahuri: राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे दि. 12 डिसेंबर रोजी नदीपात्रातील वाळू उपशास विरोध करणार्या देसवंडीच्या उपसरपंचाला 8 जणांनी लाकडी दांडा व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
सागर रामकिसन कल्हापुरे रा. देसवंडी हे देसवंडी गावाचे उपसरपंच आहेत. राहुरी पोलिसात सागर कल्हापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, देसवंडी परिसरात असलेल्या नदी पात्रातून त्यांनी वाळू उपसा करण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे वाळूतस्कर वैतागले होते. दि. 12 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजे दरम्यान देसवंडी गावातील वेशी जवळ या घटनेतील सुमारे आठ आरोपींनी उपसरपंच सागर कल्हापुरे यांना गाठले. तुझ्यामुळे आम्हाला नदी पात्रातून वाळू भरता येत नाही. असे म्हणून सागर कल्हापुरे यांना शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांड्याने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तू जर परत आम्हाला वाळू भरण्यासाठी आडवा आला तर तुझ्या अंगावर टेम्पो घालून, तुला जीवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिली.
कल्हापुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब गोपीनाथ कोकाटे, अनिकेत कैलास कोकाटे, अक्षय संजय बर्डे, रवी संजय बर्डे, शिवाजी सोमनाथ वंजारी सर्व रा. देसवंडी तसेच इतर तीन अनोळखी इसम अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक हनुमंत आव्हाड करीत आहेत.
Web Title: Crime News Beating the surpanch