संगमनेर: कारचा भीषण अपघात, पती पत्नीचा मृत्यू, लग्नासाठी चालले पण रस्त्यातच….
Breaking News | Sangamner Accident: माळवाडी शिवारात कारचा अपघात होवून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू.
संगमनेर: तालुक्यातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी शिवारात कारचा अपघात होवून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सदर घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पुणे शहरातील गुरुवार पेठ-दरेकर वाडा येथील सचिन वसंतराव दरेकर (वय 57), रमा सचिन दरेकर (वय 53), सीमा सुरेंद्र देशमुख व सुरेंद्र देशमुख असे चौघे प्रजासत्ताक दिनी पहाटे साडेपाच वाजता कारमधून नाशिकला लग्नासाठी चालले होते. दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात आले असता अपघात झाला.
त्यानंतर त्यांना उपचारांसाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविले होते. मात्र, सचिन दरेकर व रमा दरेकर या दोघांना तपासून उपचारांपूर्वीच मयत असल्याचे घोषित केले. तर गंभीर जखमी सीमा देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोकॉ. प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, साईनाथ दिवटे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेने दरेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मयत सचिन दरेकर यांचे भाऊ सतीष वसंतराव दरेकर यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे हे करत आहे.
Web Title: car accident, husband and wife die
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News